पावसाळा बहुतेक खूप जणांच्या आवडीचाच ऋतू. पाऊस म्हणल की धबधब्यावर , डॅम वर किंवा अगदी बाईक वर डोंगरदऱ्यातून भटकंती हाही तितकाच आवडीचा आणि हमखास सर्वांनाच आवडणारा भाग. पण खरच पाऊस म्हणजे आवडी निवडीचा ऋतू , फिरणे भटकणे , भिजणे किंवा अगदी पूर महापूर इत्यादी एवढे म्हणजेच पावसाळा आहे का..?
म्हणजे मला तरी तसे अजिबातच वाटत नाही. "खरंतर पाऊस म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वात जवळचा विषय." म्हणजे तो जास्तही नाही पडला पाहिजे आणि कमी तर नाहीच पडला पाहिजे. पण आजकालच्या या आधुनिक सिमेंटच्या जंगलात कुठे राहिलाय ओ तो पाऊस? आजकाल तर तो कधी रुद्रावतार घेतो तर कधी कुठे दडून बसतो हे सांगणेच अशक्य..
चला यात त्याची तरी काय चूक म्हणा; माणसाने सार निसर्ग चक्रच फिरवून टाकलंय. झाडांच्या फांद्या तोडून झाडांना आकार देण्याच्या नादात त्याने सारी झाडेच जमीनदोस्त केली. बाकी तर आहेच घर बंधायचंय कापा झाडं, रस्ते बांधयचेत पाडा झाडं... आता झाडच नसतील तर पाऊस येणार तरी कसा .? पण आपल्याला तर पाऊस वेळेत पण पडला पाहिजे , झाडेही लावायची आपली तयारी नाही कसं जमेल हो आणि सर्वच आपल्या मनासारखे कसे होईल ना... माणूस खूप प्रगती करून पुढे जाऊ शकतो पण तो निसर्गचक्र नाही बदलवू शकत ना.
खरंतर पाऊस म्हणजे जून महिन्यात पडणारा तो पहिला पाऊस. अहाहा...! "उन्हाने तापलेल्या साऱ्या धरित्रीला एका क्षणात चिंब भिजवणारा तो पाऊस. पहिल्या पावसात न्हाऊन निघाल्यावर सर्वत्र पसरणारा तो मातीचा सुगधं, हिरवीगार झाडी , डोंगर दऱ्यातून कोसळणारे ते पांढरे शुभ्र धबधबे... श्रावण महिन्यातील तो ऊन पावसाचा खेळ आणि त्या ऊन पावसाच्या खेळातून फुलणारं ते सूंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य...सांगतानाच कल्पना करणं अशक्य प्रत्यक्षात तर काय दृश्य असेल ते..! विचारूच नका."
पाऊस म्हणजे सर्वांसाठीच एक आनंददायी तर एक आव्हानात्मक गोष्टच म्हणावी लागेल. पाऊस जसा वाढत जातो तसे आपण सगळे आनंदी तर होतोच पण हाच पाऊस खूपच वाढल्यावर सर्वांची जी काही त्रेधातिरपीट उडते ती सुद्धा एक गमतीशीर गोष्टच आहे.
अर्थातच हा पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसतो यातून शिकण्यासारखे तर खुप काही आहे. फक्त आता ते कसे आचरणात आणायचे ते मात्र आपल्या हातात आहे.
आताच नुकतेच दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र किनारपट्टीवर जोरदार वेगाने निसर्ग चक्रीवादळाने आक्रमण केले होते. नक्कीच ते मोठे आणि थेट शहरी भागातून जाणारे एक मोठे वादळ होते. पण माणूस तर एवढा पुढे गेलाय की त्याला वादळाची कल्पना आधीचे मिळते ते कधी कोठे किती वेगाने येणारे याची पूर्वकल्पना आधीच मिळालेली असते त्यामुळे फारशी जीवितहानी तर नाही झाली पण जो धोका होता तो मोठा होता हे नक्की.
या पावसाळ्यातून शिकण्यासारखी एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे; आयुष्यातही अशी कितीतरी वादळे चक्री वदळे संकटाच्या रुपात म्हणा किंवा अगदी विचारांच्या रुपात देखील घोंगावत असतात ती कधी जोरदार पावसासारखी म्हणजेच दुःखदायी असतात तर कधी रिमझिम बरसणाऱ्या पावसासारखी आनंददायी आल्हाददायक असतात. पण पाऊस हा नुकसानकारक नसून तो काहीतरी चांगल्या आठवणी सुद्धा देऊन जाणार असतो तसेच हे येणारे विचार देखील घातक नसून नासधूस करणारे नसून त्यातून काहीतरी शिकवून खंबीर बनवणारे जरूर असतात.
आता बघा ना वादळाचच उदाहरण घ्या ना ते त्याची दिशा कधी बदलेल सांगता येत नाही इतकंच काय तर कधी कोठे त्याचा वेग कमी करेल हेही सांगता येत नाही आणि वेग कधी वाढवेल हेही सांगणे अवघडच. तसेच आयुष्यात येणारे विचार देखील अगदी असेच असतात कधी ते विचार करून करून डोकं आणि मन पोखरतील तर कधी तेच विचार त्यांचा दृष्टिकोन बदलून सकरात्मकता निर्माण करतील हे तर आपल्या मानसिकतेवरच अवलंबून. पण त्या विचारांवर आपण कसे लक्ष केंद्रीत करतो हे खूप महत्वाचे.
पाऊस पडण्याआधी आभाळात सारे काळे ढग एकत्र येतात आणि ते एकमेकांवर आदळून वीजा देखील कडाडतात आणि मग जी पाऊस बरसायला सुरुवात हकते ती चालूच राहते. तसं बघायला गेलं तर आयुष्यातही असेच काळ्या ढगांप्रमाणे संकेत आपल्याला मिळतच असतात पण त्यांना आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो हे केवळ आपल्याच हातात असते ...
"पावसाळ्यात तर आपण हमखास बघतो च अनेक झाडे, भिंती कमजोर होऊन पडलेले. पण आपण हा विचार कधीच करत नाही की ते पावसाळ्यातच का पडत असतील.? कारण एकच पावसाचा जोर आणि झाडांमधली आणि भिंतीमधली कामजोरता अगदी आयुष्यातही जेव्हा नकारात्मक विचारांचा पाऊस जेव्हा पडायला लागतो तेव्हा कितीही खंबीर असलेले मन हे अगदी अलगद पणे कोसळू लागते. आणि मग मानसिकता खचून जाते आणि एकदा मानसिकता खचली की माणूस आतून सपंल्यातच जमा...."
आता पावसात भक्कम पणे उभे असलेल्या झाडाप्रमाणे राहायचे की कमजोर असलेल्या झाडाप्रमाणे कोसळून पडायचे हे आपल्या हातात आहे. यामुळेच भक्कम झाडाप्रमाणे आपली मुळे आत रोवून उभं रहायच एवढंच खर...
बाकी पाऊस म्हणजे आहेच की कोकिळेचा मधुर आवाज , ढगांचा गडगडाट , विजांची तीव्र चमक , आणि चालू होणारा तो रिमझिम पाऊस आणि त्या पावसानंतरच चित्र तर अवर्णनीय. तो पहिला पाऊस पडल्यानंतरचा मातीचा सुगधं, त्या पावसातली कांदाभजी आणि चहा तो ही जुन्या गाण्यांसोबत असेल तर विचारूच नका. अप्रतिम..!
पाऊस हा नक्कीच आनंद घेण्याचा , मजा मस्ती करण्याचा ऋतू असला तरी पण आपण त्यातून खूप काही शिकू शकतो आणि हे शिकून आपल आयुष्य अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो...
"जसे ऊनपावसाच्या खेळातूनच सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते तसेच आयुष्यात येणाऱ्या अनेक चांगल्या वाईट विचारांनीच आयुष्याला एक सुंदर वळण मिळते..."
पाडगावकरांच्या कवितेतील आवडलेल्या चार ओळी नक्की लिहायला आवडतील
पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला
झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला......