काय बोलावं या विषयावर... खरंतर बोलावं, लिहावं तेवढं कमीच. अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आणि तोही प्रत्येकासाठीच. आयुष्यात असा कमीतकमी एक तरी जवळचा मित्र किंवा मैत्रीण नक्कीच असते. खरंतर मैत्री म्हणलं की खूप सारे मित्र मैत्रिणी नक्कीच असतात . परंतु एखाद्या अडचणीच्या ,सुख दुःखाच्या क्षणी सगळ्यांमधून अगदी मोजकीच नावं पुढे येतात, आणि हो खरंतर त्यांना सांगायची काहीच गरज नसते कारण त्यांना न सांगताच जवळजवळ सगळंच माहीत असते.
मैत्री, म्हणजे मला तरी या शब्दाची कोणती अशी खास व्याख्या असेल असं वाटत नाही. कारण मैत्रीत कोणत्याच मर्यादा नक्कीच नसतात. पाहिजेल तेव्हा, पाहीजेल त्या विषयावर कश्याचीही पर्वा न करता आपल्या सोबत आपला सोबती बनून नक्कीच आपल्या बरोबर उभा असतो.
मैत्री अगदी फार फार पूर्वी पासून अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. उदा. श्रीकृष्ण आणि सुदामा, संभाजी राजे आणि कविकलश, तेनालीरामा आणि कृष्णदेवराय, अकबर आणि बिरबल, दुर्योधन आणि कर्ण.. अशी खूप सारी उदाहरणे पहायला मिळतात. या सर्व उदाहरणांमधून एक मात्र नक्की कळते की कुठल्याच मैत्रीत गरीब श्रीमंत, मान सन्मान , जात पंथ , राजा आणि प्रजा अशा कुठल्याच गोष्टी दिसत नाहीत किंबहूना दिसणारही नाहीच. कारण देव आपल्याला बहीण/ भाऊ देतो आणि तेही कसेही असले तरी मान्य करावे लागतेच परंतु मैत्री हे असे एकमेव नाते आहे की जे ठरवून, किंवा कोणत्याही मर्यादा ठेवून केले जात नाही मैत्रीचे नाते म्हणजे एक अनमोल आणि अतूट बंधन असते.
खरेतर रक्ताच्या नात्याहूनही कधी कधी खूप जवळचे मित्र / मैत्रिणी खूप आधार देणारे असतात. सगळ्यात महत्वाचे मैत्रीत स्त्री पुरूष असा भेदभाव तर कधीच नसतो. मैत्रीचे नाते म्हणजे अडचणीच्या काळात आधार देणारे तर कधी आनंदात सहभागी असणारे तर कधी कट्टयावर बसून गप्पा मारणारे...
आजकालच्या या social media च्या युगात मैत्री म्हणजे Friend request पाठवण्यापुरतेच मर्यादीत राहिले आहे. Facebook, instagram यावर अनेक मित्र / मैत्रिणी असतात परंतु वेळेला धावून येतात मदतीला येतात ते क्वचितच असतात खरंतर तेच खरे मित्र असतात. भलेही इतर वेळी ते नसतील सोबत परंतु हक्काने ,आपुलकीने वेळेला साथ द्यायलाच नसतील तर ते मित्रच कसले...?
काही गोष्टी तर कधी कधी घरी देखील सांगता येत नाहीत , भावा बहिणीशी देखील बोलता येत नाही परंतु अशी एकही गोष्ट नसते की जी आपण आपल्या मित्राशी बोलत नाही. दिवसभरात घडणाऱ्या साऱ्या गोष्टी संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर मित्रासोबत बसून बोलण्यात जी शांतता मिळते ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. कधी कधी तर बोलायला एवढे काही असते की एकाभेटीत काही संपत नाही.
मैत्री कधी कोणाशी कुठे कशी होईल सांगता येत नाही परंतु ती एकदा घट्ट झाली की आयुष्यभर साथ देते अगदी कोणत्याही बिकट परिस्थितीतही. कारण त्या मैत्रीत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अगदी सर्व काही असते. चूक असल्यावर हक्काने बोलणारे, तसेच यश मिळाल्यावर कौतुक करणारे असे मित्र मिळायला तर भाग्यच लागते. आणि आयुष्यात प्रत्येकाचा असा एक तरी मित्र/मैत्रीण असतेच.
आयुष्यात मैत्रीची सुरुवात होते ती बहुतेक शाळेपासूनच. शाळेत बनलेले काही मित्र अगदी शेवट पर्यंत आपल्या सोबत असतात. नंतर जसजसे वय वाढते तसतसा मित्रपरिवरही मोठा होत जातो परंतु आपल्या जवळचा, अगदी नेहमी सोबत असणारा एक तरी 'परममित्र' नक्कीच असतो.
मित्र…कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्रच.
बाकी मैत्रीचे किस्से सांगावे तेवढे कमीच. शाळेतील मजा मस्ती, मैदानातली खेळाची भांडणे , महाविद्यालयीन जीवन ते आयुष्यच्या प्रवासात परिवरसोबतच अमुल्य गरज असते ती मैत्रीची. कारण कधी कधी रक्ताच्या नात्याहूनही जवळचे असे एकच नाते असते ते मैत्रीचे...