काल परवा सहज माळा आवरताना एक धूळ खात पडलेली पिशवी हाताला लागली. सहजच उघडून पाहिलं तर हे सारे फोटो चे अल्बम हातात आले. पहिल्यांदा तर वाटलं अरे काय हा किती तो पसारा कारण आजकालच्या मोबाईलच्या युगात कुठे अल्बम राहिलेत म्हणा.. असो पण आवरता आवरता अचानक त्यातला एक अल्बम उघडला गेला आणि आणि चटकन डोळ्यात पाणी येऊन बालपणीच्या साऱ्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्या समोर उभ्या राहिल्या.
बघता बघता कधी 6 ते 7 अल्बम बघून झाले हे कळलेच नाही. अगदी जनामपसूनच्या ते अगदी काल पर्यंतच्या साऱ्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोर होत्या. एक एक आठवण पुन्हा एकदा जगताना डोळ्यातून अश्रू ही येत होते अन हसू ही येत होते.
आपल्या मनातच एक आठवणींचा वेगळा असा खास कप्पा असतो अन त्यातून या आठवणींची फुलराणी कधी सुरू होईल सांगताच येत नाही. एकदा का या फुलरणीत बसले की ती सारी आठवणींची ठिकाणे कशी फिरवून आणते कळतच नाही. जर मोकळा वेळ मिळालाच तर ही फुलराणी कधी सूरु होऊन आठवणींची एक लांबलचक सफर घडवून आणते आणि कुठून सूरु होऊन अनेक सुख दुःखाच्या आठवणींची वळणे घेऊन कुठे नेऊन सोडेल कोणजाणे..!
काही आठवणी सुखद असतात तर काही दुःखद, पण आठवण जर सुखद असेल तर डोळ्यातून अश्रूही येतील अन जर दुःखद असेल तर कधी अलगद निरागस हसू ही येईल. प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अश्या असतात की ज्या शेवट पर्यंत विसरणं कठीण असते. आणि हा कप्पा देखील अथांग सागरासारखा पहावं तिकडे पसरलेला असतो.
आज काल तर आठवणी साठवण्याचा सोपा मार्ग म्हणजे मोबाईल. अगदी सर्वांकडे उपलब्ध. प्रत्येक क्षणाचे फोटो अगदी सहज साठवता येतात. क्षणभर पाहिले तर वाटते किती ते सारे फोटो परंतु त्यावेळी ते फोटो अगदी क्षुल्लक असतात पण तेच खूप दिवसांनी पाहताना त्याची किंमत ही अनमोल झालेली असते. ज्या आठवणी लक्षात देखील नसतात त्या सुद्धा एक फोटो पहिला तरी एक वेगळेच वातावरण निर्माण करून जातात.
ज़िंदगी में तस्वीर लेना भी जरूरी है साहब।
आईना तस्वीर तो दिखा सकता है बिछड़ा हुआ वक्त नही।।
काही घटना अश्या असतात की ज्या मनच्या आठवणींच्या कप्प्यात अगदी खोलवर जाऊन बसलेल्या असतात. *कधी आठवल्या तर सुखद आनंद देऊन जातील नाहीतर मुकामार लागल्याप्रमाणे दिसणार नाही पण वेदना मात्र प्रचंड पोहचवतील....*
आता कोणत्या आठवणी आठवायच्या आणि कोणत्या नाही हे आपल्या हातात थोडी असते म्हणा. काही सुखद आठवणी तर अश्या देखील असतात की ज्या आठवणींच्या कप्प्यात कायम दरवळत असतात. आणि त्यात जर पहिल्या प्रेमाची आठवण असेल तर विचारूच नका.
त्या आठवणी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अश्या एका वेगळ्याच विश्वात दंग करून टाकणाऱ्या असतात. भरपुरदा तर प्रेम मिळालेले प्रेमवीर एका वेगळ्याच विश्वात पाहायला मिळतात तर प्रेम सोडून गेलेले दुःखाच्या आठवणीत बुडालेले दिसतात.
आज कालच्या या धकाधकीच्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी घडतात आणि एक एक क्षण अमूल्य वाटू लागतो. एखादी चांगली गोष्ट झालेली आठवली तरी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. मग ती कुठलीही असो शाळेतील दिवस, कॉलेज मधील दिवस, बालपण , मित्रमैत्रिणींबरोबर
घालवलेला वेळ असो , फॅमिली ट्रिप असो किंवा समारंभ असो... प्रत्येक आठवणी या नेहमी खासच असतात.
आठवण कधी कोणाला कुठे आणि कोणाची येईल सांगता येत नाही, ती आनंद देणारी असेल दुःख देणारी असेल हेही माहीत नसते. पण एखादी आठवण आल्यावर आपण आपल्याच विचार मंथनात कधी हरवून जातो कळतच नाही.जाणून नजाणून पुन्हा पुन्हा तेच आठवत राहतो आणि मग नकळत आपल्यालाच त्रास होतो. *म्हणून प्रत्येकाबरोबर घालवलेला आनंदी क्षण हा खूप महत्वाचा असतो आणि शेवटी वेळ तर निघून जातेच राहतात त्या फक्त आठवणीच...*
आठवणी म्हणजेच प्रत्येकाला अनुभवायला येणाऱ्या आणि कितीही मनात दडवून ठेवल्या तरी 'कातरवेळी' झाकोळून जाणाऱ्या...
स्वप्न नगरीच्या या अंतरंगात
तुझ्या आठवणींचं चांदण पुन्हा एकदा पडूदे
क्षणभरात या साऱ्या आठवणींची चाहूल
मनात पुन्हा एकदा स्पर्शूदे..
ती रात्र आवसेची
आठवणींचा शहारा बरसणार्या धारा
पुन्हा एकदा वाहूदे
लुप्त आठवणींचा तोही कवडसा
पुन्हा एकदा अलगद उजळू दे...
Sundar ♥️😀
उत्तर द्याहटवा